श्री किशोर खैरनार लिखित हा लेख दिनांक २८ फेब्रुवारी २०१६ रोजी दिव्य मराठी या वर्तमानपत्राच्या रसिक या पुरवणीत प्रकाशित करण्यात आला.
१७ फेब्रुवारी २०१६, बरोबर तीस वर्षांपूर्वी याच दिवशी १६ फेब्रुवारीची मध्यरात्र उलटून गेल्यावर दहा मिनिटांनी जगद्विख्यात तत्त्वचिंतक व विश्व-शिक्षक जे. कृष्णमूर्ती यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ओहाय व्हॅलीमध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी कर्करौगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्वी बारा दिवस अगोदर त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता : जेव्हा कृष्णमूर्ती या व्यक्तीचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या रूपाने कार्यरत असलेल्या त्या विलक्षण प्रज्ञेचे त्या ऊर्जेचे नेमके काय होईल? हा प्रश्न अत्यत गंभीर स्वरूपाचा होता कारण कृष्णमूर्तींच्या रूपाने मानवतेचा त्या परमोच्च प्रज्ञेशी, त्या विलक्षण ऊर्जेशी संपर्क होता. परंतु जेव्हा कृष्णमूर्तीच देहरूपाने असणार नाहीत, तेव्हा त्या संपर्काचे काय होणार? कृष्णमूर्तींप्रमाणे त्या प्रज्ञेपासूनदेखील मानवता सदैव वंचित होणार का? या प्रश्नाचे सविस्तर उत्तर त्यांच्या ‘जे. कृष्णमूर्ती : जीवन आणि मृत्यू या चरित्रय्रंथात देण्यात आले आहे. त्या उत्तराचा आशय असा आहे, की कृष्णमूर्ती हे देहरूपाने जरी नसले तरी त्यांच्या शिकवणीच्या रूपाने ते सदैव मानवतेला उपलब्ध असतील. जे कोणी आत्मीयतेने त्यांची शिकवण जगण्याचा प्रयत्न करतील ते कदाचित काहीसे त्या प्रज्ञेच्या संपर्कात असू शकतील. आज कृष्णमूर्ती जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या शिकवणीचा अमूल्य ठेवा ते आपल्यापाशी सोडून गेले आहेत. ही शिकवण अमूल्य आहे, कारण त्या परमोच्च प्रज्ञेशी संपर्काचा तो एकमेव मार्ग मानवतेकडे उरला आहे. नेमकी काय आहे ही कृष्णमूर्तींची शिकवण? कृष्णमूर्तींची शिकवण त्यांच्या अनेक पुस्तकांमधून व ध्वनिचित्रफीतींमधून उपलब्ध आहे.
एकदा लेखकाला एका वाचकाने विचारले, की कृष्णमूर्तींना जे सांगायचे आहे ते त्यांनी एका पुस्तकातून का नाही सांगितले? त्यासाठी त्यांना एवढी सगळी पुस्तके का लिहावी लागली? लेखकाने उत्तर दिले, की कृष्णमूर्तींच्या शिकवणीचे सार तर त्यांनी एका वाक्यातच सांगितले आहे व ते वाक्य आहे : द्रष्टा हाच दृश्य आहे’. म्हणजे काय, वाचकाने पुन्हा विचारले. ते स्पष्ट करण्यासाठीच तर त्यांना एवढी सगळी पुस्तके लिहावी लागली. या घटनेतील विनोद सोडला तरी, त्यातील तथ्य लक्षात घेण्यासारखे आहे. कोणतीही शिकवण ही सूत्रात्मकच असते. परंतु जोपर्यंत आपण तिची आपल्या दैनंदिन जीवनाशी सांगड घालत नाही, ती आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत त्या सूत्राचा उलगडा होऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट आचरणात आणणे, ती पडताळून पाहणे, है कष्टाचे काम असते. आणि साधारणतया माणसाची कष्ट करण्याची तयारी नसते. पैसे मिळवण्यासाठी माणूस वाटेल ते कष्ट करेल पण आध्यात्मिक आकलन मात्र विनासायास, विनामूल्य मिळाले पाहिजे अशी त्याची सर्वसाधारण धारणा असते. नेमक्या याच कारणामुळे कृष्णमूर्तींची शिकवण बर्याच लोकांना अवघड वाटते व ती सर्वांसाठी नाही असे म्हटले जाते. काय आहे ही कृष्णमूर्तींची शिकवण? मानवाने तंत्रविज्ञानाच्या (टेक्नॉलॉजी) क्षेत्रात विलक्षण प्रगती केलेली असली तरी मानसशास्त्रीयदृष्ट्या तो अजूनही मागासलेलाच आहे. त्याची मानसिकता अजूनही भय, क्रोध, हिसा, असुरक्षितता, दु:ख, चिंता, महत्त्वाकांक्षा, आसक्ती, इत्यादींनी ग्रस्त आहे. संपूर्ण मानवजातीला त्याने देश, धर्म, वंश, जाती, आर्थिक परिस्थिती, इत्यादींच्या आधारे विभाजित केले आहे व त्यामुळे तो एक अत्यंत संकीर्ण, संघर्षमय व स्वकेंद्रित असे जीवन जगतो आहे. महाविध्वंसक शक्तींसकट अत्यंत उच्च व विकसित असे तंत्रविज्ञान, पण ते वापरणारी
मानसिकता मात्र अत्यंत मागासलेली, अशा विचित्र परिस्थितीमुळे मानवी अस्तित्व हे अत्यंत असंतुलित ब धोकादायक बनले आहे. कृष्णमूर्ती त्याला मानवी चेतनेतील संकट असे संबोधतात. कारण हे असंतुलन दूर केले नाही तर, स्वतःच निर्माण केलेल्या विध्वंसक शक्तींनी स्वत:चा पूर्ण विनाश अथवा हळूहळू घडून येणारा मानवी मेंदूचा पूर्ण ऱ्हास असे दोनच पर्याय मानवतेपुढे उरतात. हे असंतुलन दूर करायचे असेल तर मानवाला त्याची मानसिकता बदलली पाहिजे. कृष्णमूर्तींची शिकवण ही मानवामध्ये आमूलाग्र मानसशास्त्रीय परिवर्तन कसे घडून येऊ शकेल यासबंधी आहे. कोणत्याही गोष्टीत बदल घडवून आणण्यासाठी ती आधी समजावून घेणे आवश्यक असते व त्यासाठी त्या गौष्टीचे अवलोकन करावे लागते, तिच्याकडे पाहावे लागते. त्यामुळे मानवाला स्वत:त बदल घडवून आणायचा असेल तर त्याला स्वत:कडे बघावे लागेल व असे बघणे हे नातेसंबंधांच्या आरशातूनच शक्य आहे. कृष्णमू्तींची शिकवण ही अत्यंत परखड व वस्तुस्थितीला धरून अशी आहे. तेथे कोणत्याही अंधश्रद्धेला, आध्यात्मिक अधिकारशाहीला थारा नाही. स्वत:मध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वतःलाच स्वतःचा प्रकाश व्हावे लागेल; दुसऱ्याच्या प्रकाशाचा तेथे काहीही उपयोग नाही. कोणताही गुरू, कोणतेही पुस्तक, कोणतेही तत्त्वज्ञान, कोणतीही पद्धत, कोणतीही प्रणाली या बाबतीत उपयुक्त ठरू शकत नाही. कृष्णमूर्तींची शिकवण ही माणसातील जिज्ञासा वाढवणारी व त्याच्यात विचारणा निर्माण करणारी असली तरी ती माणसातील रूढ विचारांना व परंपरागत समजूतींना धक्का देणारी पण आहे. उदाहरणार्थ : ईश्वराने मानवाला निर्माण केले नसून, मानवानेच ईश्वराला आपल्या समजूतीनुसार निर्माण केले आहे; सामाजिक नीतिमत्ता ही अत्यंत अनैतिक आहे; जगाला वेगवेगळ्या देशात
विभागणे हा एक प्रकारचा टोळीवादच आहे; ज्ञान हे मानवी मनाला प्रदूषित करत असते; माणसाने माणसाची हत्या करणे यासारखे दुसरे निर्घृण कृत्य नाही व अशा जास्तीत जास्त हत्या धार्मिक कारणांवरून झाल्या आहेत; मनुष्य हा स्वतःला कितीही स्वतंत्र समजत असला तरी तो एक आज्ञाबद्ध (प्रोग्रॅम्ड) जीव आहे; अशी कितीतरी विधाने त्यांच्या शिकवणीत पाहवयास मिळतात. महात्मा गांधींनी जेव्हा हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून एकवीस दिवसांचा उपवास केला होता, तेव्हा एका पत्रकाराने कृष्णमूर्तींना प्रश्न विचारला, की हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा का, तुम्हाला काय वाटते? त्यावर कृष्णमूर्ती म्हणाले, की हरिजनच काय, पण ब्राह्मणांनी वा इतर कोणीही मंदिरात जाण्याची गरजच काय? कारण देव तेथे नाहीये. कृष्णमूर्तींनी मानवनिर्मित देवाचे अस्तित्व नाकारले तरी त्यांनी मानवी जीवनात अत्यंत पवित्र, विचाराने अस्पर्शित, कोणत्याही गोष्टीने कलुषित न झालेले असे काही आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला व त्या परमपावित्र्याचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी मनही पवित्र असले पाहिजे, असे म्हटले. जगातील वर्तमान धर्म हे खरे धर्मच नव्हेत कारण ते रूढी, परंपरा, अंधविश्वास, अधिकारशाही (ऑथॉरिटी ), ग्रंथ, कर्मकांड, इत्यादींवर आधारित आहेत. धर्म म्हणजे जीवनासंबंधीचे सत्य उलगडण्यासाठी स्वत:मधील सर्व ऊर्जा एकवटणे व अशा प्रकारे जगलेले जीवनच खरे धार्मिक जीवन होय असा धर्माचा नवा अर्थही त्यांनी दिला. कृष्णमूर्तीचे शिक्षणविषयक विचारही तितकेच मौलिक व क्रांतिकारक आहेत. शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे. त्यातून एक स्वकेंद्रित मानव निर्माण न होता एक जागतिक मन निर्माण झाले पाहिजे, असे मन, की जे समग्रतेने व सर्वोपांगी विचार करू शकेल. सध्याचे शिक्षण है विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या बंधनातून
मुक्त होण्यास मदत करण्याऐवजी त्यांना अधिकाधिक संस्कारबद्ध व स्वकेंद्रित करत आहे. शिक्षणात भयाचा वापर हा एक प्रकारचा आतंकवादच आहे बक्षीस व शिक्षा ही प्राण्यांना शिकवण्याची पद्धत झाली, माणसांना नव्हे. मानसशास्त्रीयदृष्ट्या शिक्षक हा विद्यार्थ्याइतकाच अज्ञानी व अशिक्षित आहे. शिकणे व शिकवणे या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया नसून विद्यार्थी व शिक्षक अशा दोघांनी मिळून एकत्रितपणे शिकणे ही एकच प्रक्रिया आहे. म्हणून विद्यार्थी हा शिक्षक व शिक्षक हा विद्यार्थी आहे. परीक्षेतील गुण हे विद्यार्थ्याची हुषारी ठरवू शकत नाहीत. एका विद्यार्थ्याची दुसऱ्या विद्यार्थ्याबरोबर तुलना करणे म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना इजा पोहोचवणे होय. शिक्षणाविषयी अशी कितीतरी आगळीवेगळी विधाने कृष्णमूर्तींच्या शिकवणुकीत पाहावयास मिळतात. कृष्णमूर्तींची शिकवण ही वस्तुनिष्ठ व विज्ञानाधिष्ठित असली तरी प्रेम हा तिचा गाभा आहे. माणसाने विज्ञानात कितीही प्रगती केली, तो अगदी चंद्रावर, मंगळावर अथवा कोणत्याही ग्रहावर पोहोचला तरी त्याच्या जीवनात जर प्रेम नसेल तर त्याचे हे सर्व यश व्यर्थ होय असे ते म्हणतात. प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे, की जी असेल तर सर्व काही आहे व जी नसेल तर काहीही नाही. मानवी जीवनात प्रेम नाही – किंबहुना ते कधीही नव्हते, म्हणूनच त्याचे जीवन समस्याग्रस्त झाले. प्रेमाविषयी बोलताना ते आपल्या प्रैमाविषयीच्या सर्व संकल्पना, सर्व अनुभव नाकारतात. प्रेम म्हणजे आसक्ती नव्हे, भावना नव्हे, वासना नव्हे, विचार नव्हे, स्मृती नव्हे, ईर्ष्या वा मत्सर नव्हे, लैंगिक संबंधही नव्हे. जेथे दु:ख असते तेथे प्रेम नसते. प्रेम हे स्थलकालनिरपेक्ष असते. ते आंधळे नसते तर प्रज्ञायुक्त असते. प्रेम ही अशी गुणवत्ता आहे, की जी मानवी जीवनाला सर्व बंधनातून मुक्त करून ते सर्जनशील बनवते, त्याला एक नवा आयाम देते.
Leave a Reply